![]() |
| जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ व गुरुवर्य प्रा.डॉ. प्रकाश कांबळे |
लेखक प्रा.डॉ. प्रभाकर तानाजी माने,
प्रोफेसर व प्रमुख, अर्थशास्त्र विभाग
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
संपादक, जय हिंद न्यूज नेटवर्क
प्रस्तावना :
समाजात काही व्यक्ती जन्मजात स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी कार्यरत असतात. त्या व्यक्तींच्या विचाराने व कृतीने समाजातील अज्ञानाचा व असमानतेचा अंध:कार दूर होतो आणि वंचित घटकांना जगण्याची नवी ऊर्जा व दिशा प्राप्त होते त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे समाज परिवर्तनाची ऊर्जा व जीवन म्हणजे संघर्षाचा प्रतीक होय. त्यांचं जीवन कार्य हे समाज परिवर्तनाच्या विचारांना चळवळीला बळ देणारी असते. प्रकाश म्हणजे आशेचा किरण अर्थात बहुजन समाजाच्या उत्थानासाठी लढणारा आशावादी सक्षम व्यक्ती होय.विद्यार्थी दशेत असताना दलित पॅंथर या सामाजिक व राजकीय संघटनेच्या माध्यमातून दलित संघर्ष योद्धा राजा ढाले व नामदेव ढसाळ यासारख्या प्रगल्भ व सक्षम नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता व पदाधिकारी म्हणून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी कार्यरत होते.
प्रा.डॉ. कांबळे सरांनी तारुण्यवस्थेत दलित समाजाच्या शोषणाविरुद्ध विविध संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न कधी रस्त्यावरची लढाई, दलित व वंचित घटकासाठी न्याय हक्कासाठी वैचारिक लढाई व वेळेप्रसंगी स्वतःवरती केसेस घेण्याचा धाडस ही. केले. मुळात दलित समाज हा अन्याय विरुद्ध वाचा फोडणारा व प्रसंगी युद्धाला सामोरे जाणारा समाज म्हणून ओळखला जातो. अशा समाजाचे नेतृत्व प्रा. प्रकाश कांबळे सरांनी केले.
देश पातळीवर कार्यरत असणाऱ्या बामसेफ या वैचारिक प्रगल्भ असणाऱ्या सामाजिक संघटनेत थिंक टँकर म्हणून कार्यरत होते. काळाच्या ओघात परिस्थिती अनुरूप अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या वैचारिक कार्यपद्धतीमध्ये बदल केला. प्राध्यापक म्हणून सेवा बजावीत असताना महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या फास्टा या प्राध्यापकीय संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा बजावली.
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर व छ.शाहू महाराज यांच्या कृतिशील विचारांना व भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ ते सातत्याने कार्य करीत आहेत. मानवतावादी दृष्टिकोनाला केंद्रबिंदू मानून अखंड मानव जातीच्या कल्याणाचा सात्विक व पवित्र विचार उराशी बाळगून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी कटिबद्ध असतात. आई-वडिलांनी दिलेल्या संस्कार व विचारांची जपणूक करीत संघर्ष करण्याची शक्ती व ऊर्जा त्यांना प्राप्त झाली. या पार्श्वभूमीच्या आधारावर त्यांनी नियमितपणे समाजातील प्रत्येक घटकांचा कल्याणात्मक विचार केला. यासाठी त्यांनी संविधान व महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत राहीले.बहुजन समाजातील वंचित घटक व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व नोकरीकामी निस्वार्थी भावनेने व सढळ हाताने आर्थिक मदत केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असतात.
. प्रा.डॉ. प्रकाश कांबळे सर हे शिवाजी विद्यापीठ परीक्षा केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत असताना शिवाजी विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात यावे. तसेच उच्च पदावर विराजमान होऊन समाज व राष्ट्रसेवा करावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ते विद्यार्थ्यांशी मैत्री भावनेने तर कधी गुरु भावनांने विद्यार्थी व त्याच्या पालकांशी सुसंवाद साधत असे. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये सुयश संपादन करून अनेक पदावर कार्यरत आहेत. आजही हे विद्यार्थी सरांशी संपर्कात असून अनेक पातळीवर समन्वय साधत असतात. हे त्यांच्या उत्तम नेतृत्व, दातृत्व व कर्तृत्वाच्या माध्यमातून साध्य झाले आहे याबाबत तीळ मात्र शंका नाही. वंचित व बहुजन घटकांचा आवाज म्हणजे प्रा.डॉ. प्रकाश कांबळे असे समीकरण तयार झाले आहे.
प्रा.डॉ. कांबळे सर हे फुले,शाहू व आंबेडकर फोरम, कोल्हापूर या संस्थेत सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ता म्हणून सेवा बजावीत होते. या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि समताधिष्ठित लोकशाहीसाठी कटीबद्ध होते.या संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत यामध्ये जनजागृती, प्रबोधनात्मक व शैक्षणिक शिबिर, वाचनालय, अभ्यासिका व जन आंदोलने या सर्व सामाजिक कार्यामध्ये अग्रभागी होते.
म.फुले, छ.शाहू व डॉ.आंबेडकर आंबेडकर यांच्या समाज परिवर्तन कार्याचा विविध मार्गाद्वारे प्रचार व प्रसार करत होते.
. धम्म परिषद ही समाजातील वंचित घटकाच्या परिवर्तनाचे व सर्वांगीण विकासाचे एक प्रभावी साधन ठरले असून यासाठी प्रा.डॉ. कांबळे हे आघाडीचे समता सैनिक व पदाधिकारी होते. त्याने अनेक सामाजिक चळवळीचे व विद्यापीठ पदावर कार्यरत होते. कोल्हापूर शहर व परिसरात धम्म परिषदेचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केले. यासाठी त्यांनी धम्माचा प्रचार व प्रसार केला. महापरिनिर्वाण दिन व धम्मचक्र परिवर्तन या दिवशी धम्म परिषद घेऊन धम्माचा प्रचार केला. यासाठी विशेष करून समाज प्रबोधन, धम्म व्याख्याने, शैक्षणिक उपक्रम व सामाजिक एकजूटता निर्माण करण्याचा कार्य केले.
तथागत गौतम बुद्ध,म.फुले, छ.शाहू व डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात शेकडो व्याख्याने दिली. डॉ. कांबळे हे मानवतावादी, वंचित घटक व बहुजन समाजाच्या हितासाठी उदात्त ध्यासाने पछाडलेले होते. बहुजन हितार्थ कार्यरत असणाऱ्या विविध सामाजिक संघटना व मंडळाची वैचारिक नाळ जोडून पूर्णवेळ सेवाभावी वृत्तीने कार्यरत राहिले. विविध वृत्तपत्रे, साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंक यासाठी शेकडो लेखांच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व चे दर्शन घडवले. मानवतावादी व बहुजनवादी विचारांची बैठक असल्याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सामाजिक आशयाचे विषय घेऊन त्यांनी शोध निबंध लिहिले.
छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शाहू महाराजांच्या आर्थिक कार्याचा आकलन होण्यासाठी त्यांनी
एम. एम. अर्थशास्त्र या पदव्युत्तर विभागासाठी "थॉट्स ऑफ राजर्षी शाहू" (Thoughts of Rajarshi Shahu) आणि"इकॉनॉमिक्स थॉट्स ऑफ डॉ.बी.आर.आंबेडकर (Economic Thoughts of Dr B. R.Ambedkar) हा पेपर सुरू करून अध्यापनाचा कार्य सातत्याने कार्य ठेवले. "Contemporary Relevance of Economic Thoughts of Dr B R Ambedkar" विषयांवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन अणि शोध निबंधावर आधारित ग्रंथ प्रकाशन करून आपली समतावादी विचारांची भूमिका स्पष्ट केली.
जसे विचार, तशी अमृतवाणी तशी कृतीशील कार्यक्रम राबवणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. प्रकाश कांबळे यांचा नावाचा उल्लेख होतो. रेडिओ केंद्र, टीव्ही चॅनल या दृक साधनाद्वारे महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत शेकडो लोक प्रबोधनात्मक व्याख्यान दिली.
जयसिंगपूर शहरात डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान मालिकेत डॉ. बाबासाहेब : एक जगविख्यात अर्थशास्त्र या विषयावर केलेल्या सखोल अभ्यासू मांडणी, दिलेली वास्तव दाखले व आंबेडकर प्रेमी
श्रोत्यांनी दिलेला उदंड प्रतिसाद या सर्वांचा मी स्वतः साक्षर होतो. प्रा.डॉ. कांबळे यांचे उत्तम वक्तृत्व, समाजाबद्दल असलेली पोट तिडकी व ज्ञानसंपन्नतेचा अमृत ठेवा पदोपदी दिसून आला.
मुळात अर्थशास्त्र विषयाची अनेक ग्रंथ संपदा, विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अन्य सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या महापुरुषांची पुस्तके ग्रंथालयात होती. इतकी समृद्ध ग्रंथालय एका प्राध्यापकाच्या घरी असणार हे वैचारिक समाज परिवर्तनाची सक्षम बाजू आहे असे मानावे लागेल. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांना विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक ग्रंथ भेट देऊन वैचारिक वारसा पुढे चालावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. सध्या ते वर्षावास धम्म परिषद कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
सामाजिक व दलित चळवळीत कार्यरत असताना समाजातील प्रतिभावंत व्यक्ती प्रा. गौतम पुत्र कांबळे, प्राचार्य डॉ. शिरीष भालेराव, प्रा. डॉ. भरत नाईक या दिग्गज व्यक्तींच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्व, सहकार्य व मार्गदर्शनाखाली FASTA या शिक्षक संघटनेत महत्वपूर्ण योगदान देता आले.
तसेच सामाजिक चळवळीतील उच्च कोटीचे प्रा. अंबपकर व प्रा. चोकाककर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक (प्रज्ञा शील करुणा) विद्यार्थी संघटनेत सक्रिय सहभाग घेऊन महत्वाची कामगिरी बजावली. बुद्धी, विवेक व प्रेरणावर आधारित प्रशिक बौद्धिकजीवी संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा व शहर परिसरात समाजातील दुर्बल घटकांना स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून संगोपांग मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच वैचारिक प्रबोधन करून समाजातील वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले.
पर्यावरणपूरक चळवळींसाठी प्रबोधनात्मक व्याख्याने व मार्गदर्शन देऊन जागरूकता निर्माण केली. समाजातील ऐक्य व एकोपा वृद्धीसाठी संघटनात्मक व सृजनशील कामगिरी केली.
शैक्षणिक, बौद्धिक,सामाजिक व संशोधनात्मक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या हीरक महोत्सवी वर्षा निमित्त डॉ. प्रकाश कांबळे यांना "शिवाजी विद्यापीठ गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२४" ने गौरविण्यात आले.
पेशाने प्राध्यापक असलं तरी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख होतो. रात्र दिवस परिवर्तनाचा ध्यास घेऊन शोषित घटकासाठी, सामान्यांचा आवाज बुलंद करणाऱ्या, सामाजिक विषय अर्थशास्त्रीय
परिपेक्षा मधून मांडणी करणाऱ्या, सामाजिक समता हाच स्थायीभाव म्हणून कार्यरत असणाऱ्या अलौकिक व प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वाला अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले.
१) फुले, शाहू व आंबेडकर सामाजिक संघटनेचा समाज भूषण पुरस्कार २०२४
२) वर्षावास धम्म परिषद कोल्हापूर चा समाज भूषण पुरस्कार २०२३
३) फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटनेचा समाज भूषण पुरस्कार २०२४
४) वर्षावास धम्म परिषद कोल्हापूर चा समाज भूषण पुरस्कार २०२३
अशा शेकडो पुरस्काराने सन्मानित झालेल्या या सामाजिक संवेदनशील शोषित वर्गाचा वैचारिक तारणहार, बुद्धिजीवी अर्थात आमचे गुरुवर्य
प्रा.डॉ. प्रकाश कांबळे यांचे जीवन हे समाज परिवर्तनासाठी समर्पित कार्यकर्त्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. ते विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान, वंचित घटक आणि समाज परिवर्तनाचे दीपस्तंभ आहेत.
आज ते सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे असले तरी त्यांचा वैचारिक प्रवास, त्यांची समाजनिष्ठ वृत्ती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली अपार माया समाजाला कायमच मार्गदर्शक ठरेल. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच कृतज्ञ भावना.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा